सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती हणमंत तगडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
शेवंती हणमंत तगडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर हणमंत खाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सागर खाडे याला मदत करणाऱ्या चार संशयितांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला मदत करणाऱ्या सुनील पुजारी आणि पंडित ऐवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सागर खाडे, सुरेश हणमंत जगदाळे, उदय घाडगे हे फरार आहेत. पोलिसांकडून यांचा शोध चालू आहे. सरोजा हिचे पूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पण तिचे आणि तिच्या पतीचे पटत नसल्यामुळे ती पतीपासून स्वतंत्र रहात होती. यानंतर तिचे आणि सागरचे प्रेमसंबंध जुळले होते. तसेच ते एकत्र राहत होते. आपण लवकरच लग्न करु असे आश्वासन सागरने सरोजला दिले होते.असे शेवंती हणमंत तगडे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
सगळे सुरळीत असताना सागर अचानक काही दिवसांपासून दारु पिऊन सरोजला मारहाण करत होता. सागर याचा मामा सुरेश जगदाळे व मित्र ऐवळे, घाडगे यांनी सरोजला सागर सोबत लग्न करायचे नाही, असे धमकावून तिला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते पण सागरचा मामा जगदाळे आणि माझ्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले. यानंतर सागरने सरोजसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सरोजने 10 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या सर्व प्रकाराला मामा आणि त्याचे मित्र जबाबदार असल्याचे शेवंती हणमंत तगडे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.