कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 28 ऑगस्ट 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये 95.60 कोटी रु. च्या खर्चास वित्तीय मान्यता देण्यात आली होती. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी निधीची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आपण विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण करू असा शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. तो आता त्यांनी पाळला.

दि. २१ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं. कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारी करणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एम ए डी सी ने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या 221.51 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

https://fb.watch/oDhFua8lgN/?mibextid=Nif5oz·

कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी निधी मिळाला असून लवकरच एम ए डी सी कडून कामास सुरुवात होणार आहे.

खर्चाची तरतुद अशी

१) सुमारे 45.82 हेक्टर अतिरीक्त जमिन संपादन,

२) प्रांत कार्यालय अस्थापना खर्च, प्रकल्पबाधीत घरांची किंमत – 89 कोटी 71 लाख

३) प्रकल्पबाधित घरांचे पुनर्वसन जागी सुविधांसाठी खर्च – सात कोटी १२ लाख

४) प्रकल्प बाधितांच्या कॉलनीसाठी खर्च – 20 कोटी

५) बाधित शेतक-याच्या पुनर्वसन पॅकेजसाठी – 11 कोटी 53 लाख

६) टर्मिनस बिल्डींग, एटीसीटॉवर, फायर यंत्रणा खर्च – 10 कोटी 91 लाख

७) धावपट्टीचे काम, ॲप्रन, नेव्हीगेशन, कम्युनिकेशन सिस्टीम – 29 कोटी 73 लाख

८) जमिनीचे सपाटीकरण, संरक्षक भिंत, पावसाळी नाल्याची निर्मीती ः 14 कोटी 59 लाख

९) भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाइनचे स्थलांतर खर्च – आठ कोटी 50 लाख

१०) प्रकल्प सल्लागार शुल्क, इतर नियामक मंडळांची मंजूरी खर्च – एक कोटी 26 लाख

११) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा प्रशासकीय, आस्थापना खर्च – आठ कोटी चार लाख

१२) प्रकल्प खचात 10 टक्के वाढ धरुन होमारी रक्कम ः 20 कोटी 12 लाख