हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरबुरी सतत चव्हाट्यावर येताना आपण पाहिले आहे. त्यातच आता काँग्रेसचे 25 आमदार नाराज असून ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे आमदार पुढील महिन्यात दिल्लीत प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. यादरम्यानच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ घेतला आहे. काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नसल्यामुळे ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंत्र्यांकडूनच सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहकार्य होत नसल्यामुळे काम लवकर होत नाही आहेत असे नाराज आमदारांचे म्हणणे आहे.
राज्यातील मंडळ आणि महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्याचबरोबर सरकारला अडीच वर्ष होऊनही नियुक्त्या झाल्या नसल्यानं या सर्वांची तक्रार आमदार दिल्ली दरबारी करणार आहेत. सत्तेत असूनही आमची गेली अडीच वर्ष आपल्याच मंत्र्यांमुळे वाया गेली असल्याची व्यथा ते दिल्लीत मांडणार आहेत.