प्रतापगडाच्या संवर्धानासाठी 25 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे 363 वा शिवप्रताप दिनास उत्साहात सुरूवात झाली आहे. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. महादेव जानकर, आ. भरत गोगावले उपस्थित आहेत. मुख्यमंत्री यांचे तुतारी वाजवून ढोल- ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गडावर भवानी मातेची विधिवत पूजा व आरती मुख्यमंत्र्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आजही या ठिकाणची माती पराक्रमांची साक्ष देत आहे. छ. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. रयतेच्या गवताच्या काडीच्या देठाला हात लागता कामा नये, अशी महाराजांची भूमिका होती. रयतेच्या रक्षणासाठी असलेला एक राजा म्हणजे छ. शिवाजी महाराज होते. शिवभक्तांची इच्छा, भावना व मागणी होती, या गडावरील अतिक्रमण हटले पाहिजे. परंतु आम्ही छ. शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सरकार स्थापन केले. सातारा जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करतो. न्यायालयाने जो निवाडा दिला होता, त्यानुसार प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. छ. शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे दर्शन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच आई भवानी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मिथून माने यांनी केले.