Saturday, March 25, 2023

शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यातून सुटका करून घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बाहेर पडले असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. आज प्रतापगडावरील भाषणात त्यांनी हे विधान केलं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रातील किल्ल्यात बंद करून ठेवले होते. परंतु स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी तेथून आपली सुटका करून घेतली आणि त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली . अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. पण शिंदे सुद्धा बाहेर आले असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो अशा लोकांची तुलना शिवरायांशी करणे म्हणजे फक्त महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र्रचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. हे पूर्णपणे प्लॅन आहे. राज्यपाल जे बोलते होते तेच आज हे मंत्रीमहोदय बोलले आहेत. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.