Tuesday, June 6, 2023

पुणे विद्यापीठातील 27 एकरातील क्रिडा संकुलास पै. खाशाबा जाधव यांचे नाव आणि पूर्णाकृती पुतळा उभारणार

पुणे | सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्‍तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पूर्णाकृती शिल्प साकारण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून येत्या महिनाभरात पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. पै. खाशाबा जाधव याचे नांव या संकुलाला दिले जाणार असून पूर्णाकृती शिल्पही उभारण्यात येणार आहे.

पुणे येथील बालेवाडी येथील क्रिडा संकुलानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा क्रीडा संकुल मोठे असणार आहे. तब्बल 27 एकर जागेत इनडोअर तसेच आऊटडोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केलेली आहे. या संकुलाला पै. खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतासाठी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला होता. त्यांच्या या कार्याची दखल, तसेच भावी खेळाडूंना त्यांचे शिल्प प्रेरणादायी ठरावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे हे पूर्णाकृती शिल्प ब्राँझ धातूत असेल. सुमारे पाचशे किलो वजनाचे हे शिल्प असणार आहे. सध्या त्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभीकरण, तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्‍कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यापीठाला देण्यात आली आहे.