हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गट आठवड्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी आणखी 22 रुग्ण वाढले होते. दरम्यान, आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 82 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती केली असली तरी नागरिकांकडून त्याबाबत म्हणावे तसे पालन केले जात नसल्याचे दिसते. दरम्यान, दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी 22 कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला होता. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 293 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 32 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर 9 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पॉझिटीव्ह रेट हा 10.92 टक्के इतका आहे.
गेल्या 15 दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात राज्यात सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढू लागली असून मागील पाच दिवसांत नवीन 65 रुग्ण समोर आले आहेत. तर रविवारी एकाच दिवसात कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.