उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेजाऱ्याने एका शुल्लक कारणावरून एका 4 वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपीचे एका महिलेसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच वादातून आरोपीने त्या महिलेच्या 4 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून हत्या केली. या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी कांचनसिंग पासी याला प्रयागराज रेल्वे स्टेशनहुन अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागात गुड्डन ठाकुर हे पत्नी आणि मुलांसह राहतात. मागच्या आठवड्यात आरोपी कांचनसिंग याचे गुड्डन ठाकुर यांच्या पत्नीसोबत एका क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. यादरम्यान त्या महिलेने आरोपीला मारहाण देखील केली. याचा राग आरोपी कांचनसिंगच्या मनात होता. यानंतर त्याने अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले. त्यामुळे त्याने 20 एप्रिल रोजी मृत राजचे अपहरण केले. यानंतर आरोपी कांचनसिंग हा राजचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेश या आपल्या मुळगावी घेऊन निघाला होता. मात्र वाटेमध्येच राजने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे कांचनसिंग याने त्याला अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका निर्जनस्थळी नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली. तसेच याची माहिती कोणाला कळू नये म्हणून त्याने राजचा मृतदेह झाडाझुडपात लपवला. दरम्यान, तीन ते चार दिवसानंतर ऑर्डनन्स भागात स्थानिकांना मृतदेह आढळून आल्यावर त्यांनी अंबरनाथ पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. यादरम्यान उल्हासनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना समजले कि मृत राजच्या आईशी काही दिवसांपूर्वी कांचनसिंग याचे भांडण झाले होते. यानंतर पोलिसांनी कांचन सिंग याच्या मागावर पोलीस पथक रवाना केले. त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशन च्या माध्यमातून कांचन सिंग हा पवन एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशला जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. यानंतर उल्हासनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयाग राग रेल्वे स्टेशनवरून कांचन सिंगला ताब्यात घेतले. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनीता राजपूत, पोलीस विष्णू मोगरे,लक्ष्मण पांढरे, चंद्रहास बोरसे यांनी या प्रकरणी विशेष कामगिरी पार पाडली.