राणा दाम्पत्याचे डी गँगशी कनेक्शन ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सध्या अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालून वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचे समोर येत आहे. युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतले आहे. असा मोठा गौप्यस्फोट करत राऊतांनी या डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्याने कुठे केला? त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल फडणवीसांना केला आहे.

संजय राऊत यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक महत्वाचे ट्विट केले असून त्यामधून त्यांनी राणा दाम्पत्याच्या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सक्तवसुली संचालनालयाने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी लकडावाला अटक केले होते. जेलमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला. युसूफने बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या कमाईचा काही भाग नवनीत राणांच्या अकाऊंटमध्ये आहे,”

दरम्यान माध्यमांशी संवाद साधता राऊत यांनी म्हंटले की, भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईमधील घडामोडी यामागे डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत आहे. नवनीत राणांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. ईडी आता नवनीत राणा यांना चहा कधी पाजणार आहे? या डी गँगला का वाचवले जात आहे? भाजपा शांत का आहे? अशी विचारणा राऊत यांनी यावेळी केली आहे.

फडणवीस आता गप्प का?

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आज निशाणा साधला आहे. “राणा दाम्पत्याने अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे. या प्रकरणातला त्यातला एक पुरावा मी समोर आणला असून राणा दाम्पत्य जे अचानक राम आणि हनुमान भक्त झाले. त्यात ते इतके डुबले की, मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले. मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. 92 च्या दंगलीत अंडरवर्ल्ड कनेक्शन, पाकिस्तान कनेक्शन, डी गैंग कनेक्शन असणाऱ्या अनेक माफिया टोळ्या होत्या. जे 15 दिवसात घडते आहे, त्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण यामागे डी गंग आणि त्यांचा पैसा काम करतो, असा आरोप राऊत यांनी केला आहे.