बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाला मध्यस्थी करणे त्याच्या जीवावर बेतले आहे. भाच्याच्या हॉटेलात जेवण केल्यानंतर काही तरुणांनी बिल देण्यावरून भाच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या मामाला आपला जीव गमवावा लागला आहे. आरोपी तरुणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून हॉटेल चालकाच्या मामाचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
किशोर नंदलाल गुरखुदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बीड शहरातील जव्हेरी गल्ली येथील रहिवासी होते. मृत गुरखुदे हे पानटपरीचालक असून बसस्थानक परिसरात त्यांचे छोटेसे दुकान आहे. याच परिसरात त्यांच्या भाच्याचं हॉटेल आहे. घटनेच्या दिवशी आरोपी मृत व्यक्तीच्या भाच्याच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यादरम्यान आरोपींचा आणि हॉटेल चालकाचा जेवणाच्या बिलावरून वाद झाला. यावेळी मृत किशोर गुरखुदे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले.
यावेळी संतापलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याच्या सहाय्याने किशोर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर ते जखमी अवस्थेत खाली कोसळले. यानंतर आसपासच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान किशोर नंदलाल गुरखुदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.