कोरेगाव मतदार संघासाठी अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद : आ. महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि नव्याने रस्ते तयार करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची सुधारणा होणार असून, मतदारसंघाच्या विकासामध्ये तो मैलाचा दगड ठरणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

खंडाळा-जयसिंगपूर-शिरोळ राज्यमार्गाच्या सातारारोड ते जळगाव या चार कि. मी. अंतराच्या सुधारणेसाठी 4 कोटी 60 लाख रुपये, कोरेगाव शहर ते डी. पी. भोसले कॉलेजदरम्यान चौपदरीकरण व सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये, जिहे-कठापूर -कोरेगाव-खेड (नांदगिरी)-सातारारोड-पळशी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कठापूर ते कोरेगाव दरम्यान रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये तर राज्य मार्ग क्र. 140 ते कोरेगााव तालुका हद्दीपर्यंत या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भुईंज-शिवथर-पाडळी-जळगाव या प्रमुख जिल्हा मार्ग आणि ऊस वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा रस्ता असल्याने त्याच्या शिवथर रेल्वे गेट ते भीमनगर फाटा या सव्वा दोन कि. मी. अंतराच्या सुधारणेसाठी 1 कोटी 20 लाख रुपये तर भीमनगर फाटा ते जळगाव दरम्यान रस्त्याच्या सुधारणेसाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

वडूथ-सातारारोड-अंबवडे सं. कोरेगाव-किन्हई या प्रमुख जिल्हा मार्गावर अंबवडे संमत कोरेगाव येथे पुलाचे बांधकाम आणि रस्त्याचा चढ कमी करण्यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये, या रस्त्यावरच सातारारोड गावात पुलाचे बांधकाम करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मर्ढे ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या दोन कि. मी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खटाव तालुक्यात प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 10 ते धारपुडी-खटाव-जाखणगाव या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 97 येथे खटाव गावाजवळ येरळा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर धारपुडी येथे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये, खातगुण येथे राज्य मार्ग क्रमांक 146 ते राज्य मार्ग क्रमांक 141 ला जोडणार्‍या खातगुण ते कटगुण या रस्त्याची लहान पुलाच्या बांधकामासह सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 80 लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 38 ते जांब -जाखणगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.