दहिवडी वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने म्हसवड महसूल व पोलिसांची नाचक्की झाली असून अवैध वाळू उपसा समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दि. 17 जून रोजी पहाटे 4 वाजता वरकुटे- म्हसवड, (ता. माण) येथे कारवाई करण्यात आली. वाळूच्या ठेक्यावर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
या छाप्यात कृष्णा बळीराम चोरमले (रा. बीड), डेगलाल भुनेश्वर राणा (रा. बारशिंगा, बरगहट्टा हजारीबाग झारखंड), भैया मधुकर चव्हाण (रा. वरकुटे-म्हसवड), नामदेव गुलबा शिंदे (रा. पानवण, ता. माण), विजय धर्मा शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सपोनि डी. एस. वाळवेकर, पोलिस हवालदार राणी फाळके, ओंकार दिक्षीत, अमित शेडगे, प्रसाद शिंदे, रुद्रयान राऊत, तडाखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.