7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल अशा गोष्टी देण्यात येतील.

ई-पॉस प्रणालीद्वारे आनंद शिद्याचा प्रतिसंच 100 रुपयांना वाटला जाईल. याचा बीपीएल, पिवळे, प्राधान्य केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना लाभ होईल. मुख्य म्हणजे, राज्यांतील एक कोटी ६५ लाख ६० हजार नागरीकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शासनाकडून या आनंद शिध्यासाठी तब्बल ४९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यासाठी आनंद शिध्याचे 7 लाख 78 हजार 203 संच मंजुर करण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात कोणत्याही गोरगरिबाला उपाशी झोपायची वेळ येऊ नये तसेच त्याने या सणांना उत्साहात साजरी करावे यासाठी राज्य सरकारने आनंद शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. हा सर्व शिधा तालुक्यांच्या साठवण गोदामापर्यंत पुरवठा विभागातून पाठविला जाणार आहे. याचे वाटप गरजू नागरिकांसाठी करण्यात येईल. यामुळे याचा फायदा अनेक गरजू कुटुंबांना होणार आहे.

दिवाळीत दुसरा टप्पा

गणेशोत्सवानंतर दिवाळीत आनंद शिधा वाटण्यात येणार आहे. त्यावेळी या आनंद शिध्याच्या संचाची संख्या देखील वाढवली जाईल. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आनंद शिधा वाटण्यात आला होता. याचा फायदा अनेक गोरगरिबांना झाला होता. आता पुन्हा सणाच्या काळात हा शिधा वाटण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता गोरगरिबांची दिवाळी देखील गोड होणार आहे.