नात्याने भाऊ लागणाऱ्या 6 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुग्राममधील सोहना शहरात एका 14 वर्षीय मुलीवर नात्याने भाऊ लागणाऱ्या तिच्याच 6 भावांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि गुन्हा केल्यानंतर तेथून फरार झाले. या सहा आरोपींवर पोलिसांनी कलम ३६३ आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा केला आहे. तसेच, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलीच्या घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले होते. त्यामुळे पीडित मुलगी आपल्या लहान भावांसोबत घरी एकटीच होती. परंतु थोड्या वेळानंतर मुलगी घरातून गायब झाल्याचे तिच्या काकांच्या लक्षात आले. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांना घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या घराचे गेट उघडे दिसले. त्या घरातून काही मुले पळत बाहेर आली. त्यांच्या मागून पीडित मुलगी देखील रडत बाहेर आलेली काकांना दिसली.

ज्यावेळी तिची विचारपूस करण्यात आली तेव्हा तिने सांगितले की, 6 तरुणांनी तिला घरातून उचलून बांधकाम सुरू असलेल्या घरात नेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी जबरदस्ती केली. तसेच मी ओरडू नये यासाठी त्यांनी तोंडात कापडाचा बोळा देखील कोंबला. या सहा तरुणांनी एका मागोमाग लैंगिक अत्याचार केले. मुलीने दिलेल्या या माहितीनंतर तिच्या काकांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच, या घटनेनंतर पीडित मुलीला सोहना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून मुलीवर उपचार सुरू आहेत. तसेच, याप्रकरणी आरोपींना लवकर अटक केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबीयांना दिले आहे. मुख्य म्हणजे, आरोपी पीडितेचे नात्याने भाऊच लागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घरी कोणीच नसल्याचे आरोपींना अगोदरच माहीत होते. ज्यामुळे त्यांनी तिला घरातून उचलण्याचे धाडस केले.