हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातीलआकले गावात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या गावातील 30 वर्षीय तरुणाचा चिंचेच्या झाडावर असलेलया मधाचे पोळ काढताना फांदीवरून पाय घसरून मृत्यू झाला आहे. सुरज वामन काटकर (वय 30, रा. आकले, ता. जि. सातारा) असे झाडावरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकले गावातील तरुण सुरज काटकर हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. गाव परिसरातील वेण्णा नदीवर मच्छीमारी करण्यासाठी तो आपल्या कुटूंबासह दररोज जात असत. दिवसभर मासेमारी करणे, खेकडे पकडणे आणि त्याची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे असा सुरजचा दररोजचा नित्यक्रम होता. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी आपल्या मित्रांसमवेत मासेमारी करण्यासाठी नदीवर गेला होता.
मासेमारी करत असताना नदी किनारी कळंबे गावातील कृष्णा वामन इंदलकर यांच्या मळवी नावाच्या शिवारात सुरज गेला. त्यावेळी त्याला चिंचेच्या झाडावर शेंड्यात मधाचे पोळ दिसले. सुरज हा कातवडी समाजाचा असल्याने मच्छीमारीसह मधाचे पोळ काढून त्याची विक्री तो अधूनमधून करत होता. त्यामुळे ते काढण्यासाठी चिंचेच्या झाडावर सूरज चढला. मधाचे पोळ झाडाच्या शेंड्यात असल्याने हाताने फांदी धरून ओढत असताना अचानक फांदीवरून पाय घसरल्याने तो जमिनीवर कोसळला. अचानक खाली कोसळल्यानंतर सुरजच्या हनुवटीला मोठी दुखापत झाली. यावेळी त्याच्यासमवेत असलेल्या मित्राने ही माहिती आकले गावातील त्याच्या कुटूंबियांना दिली.
सुरजचे कुटूंबीय व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सुरजला खासगी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती सचिन ज्ञानेश्वर जाधव (वय 28, रा. आकले, ता. जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी सहाय्यक फौजदार देशमाने तपास करीत आहेत.