Tuesday, January 7, 2025

ट्रॅक्टरला कार धडकून झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जत साखर कारखाना गेट समोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आणखीन एका चारचाकी गाडीच्या धडकेत बाप-लेकाचा बळी गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातास कोण जबाबदार पोलीस यंत्रणा? का जत साखर कारखाना असा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. विजापूर-गुहागर या मार्गावर राजारामबापू साखर कारखानाच्या गेटमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर वळण घेत असताना रविवारी संध्याकाळी कुंभारी येथील हॉटेल व्यावसायिक रवी माळी हा बुलेट स्वार जाऊन धडकला त्यात तो जागीच ठार झाला.

या अपघातातील ट्रॅक्टर पोलीस यंत्रणा व कारखाना प्रशासनाने लवकर काढला असता तर यात कर्नाटकातील दोघांचा बळी गेला नसता ही वस्तुस्थिती आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या ट्रॅक्टर अपघातानंतर तो ट्रॅक्टर कारखाना गेटसमोर तसाच उभा राहिल्याने कर्नाटकातील कनमडी येथील कार गाडी नागज मार्गे सांगलीकडे जात असताना या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली या भीषण अपघातात प्रशांत पांडुरंग भोसले व त्याचा एक वर्षाचा मुलगा मणिकंठ हे जागीच ठार झाले. इतर चौघेजण गंभीर जखमी झाले.

मयत प्रशांत भोसले हे कर्नाटकातील कनमडी येथील रहिवासी आहेत. प्रशांत यांना मणिकंठ (वय 1 वर्ष) व कार्तिकी भोसले (वय 6) अशी दोन मुले आहेत व मणिकंठचे जावळ काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पालीच्या खंडोबाकडे जाण्यासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. या कारमध्ये आई इंदुमती पांडुरंग भोसले पत्नी भाग्यश्री प्रशांत भोसले व भाऊ प्रवीण भोसले असे सहा जण सांगली येथील बहीण आशाराणी व अनिता पवार यांना भेटून सकाळी पालीच्या खंडोबास जाण्याचा बेत आखला होता. पण काळाने झडप घातली या भीषण अपघातात मयत प्रशांत भोसले यांची गाडी चक्काचूर झाली आहे.