केंद्राचा यामागे कुठलातरी कुटील डाव; विनायक राऊतांचा भाजपवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र, मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध आहे. या निर्णयामागे केंद्राचा कुठलातरी कुटील डाव असू शकतो, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे. तो चुकीचा आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामागे कुठला तरी कुटील डाव असू शकतो.

यावेळी राऊतांनी राज्यात घडत असलेल्या घडामोडीवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून त्रास दिला जात आहे. मात्र, काहीही झाले तरी सिंधुदुर्गात चारही नगरपरिषदेत युती यशस्वी होणारच. रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात जी काही गटबाजी सुरु आहे. त्याबाबत आता उद्धव ठाकरे लक्ष घालतील, असेही राऊत यांनी सांगितले.