हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वी जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा पार पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु आता ही सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश मोडल्यामुळे संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नविन वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असताना जरांगे पाटील विविध ठिकाणी आपल्या सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून ते राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधताना देखील दिसत आहेत. मध्यंतरी जरांगे पाटील यांची सभा धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीदेखील आयोजकांनी ही सभा भरवली. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे आदेश असताना आणि दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवण्यामुळे आयोजकांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात जरांगे पाटील यांच्या सभांमुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.