परदेशी प्रवासाची माहिती लपविल्याने दोघांवर गुन्हा दाखल, मनपाने केली तक्रार

औरंगाबाद – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखणाऱ्या औरंगाबाद पॅटर्नची देशभर चर्चा झाली. हा पॅटर्न एवढा प्रभावी ठरण्याचं कारण आहे, महापालिकेने बनवलेली कडक नियमावली, आणि घेतलेली खबरदारी. राज्यात ओमिक्रॉनचा वेगानं प्रसार होतं असल्यामुळे राज्यासह औरंगाबाद महापालिकाही पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. औरंगाबाद महापालिकडून परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून चौकशी सुरू आहे, प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांच्या विरोधात महापालिकेने कठोर पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

आपल्या परदेशी प्रवासाची माहिती लपवल्याने दोन प्रवाशांवर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडाले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यात साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेने जे परदेशी प्रवासी आले आहेत. त्यांनी आपली माहिती महापालिकेला कळवावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. मात्र दोन प्रवाशांनी आपली माहिती गोपनीय ठेवली आणि त्यानंतर महापालिकेडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी सध्या राज्य सरकार जे करता येईल ते करत आहे. राज्यातील महापालिकांनीही खबरदारी म्हणून काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचं पालन न झाल्यास महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. हे सर्व नियम नागिकांच्या सुरक्षेसाठी आहेत, मात्र काही ठिकाणी नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे आणि त्यानंतर त्यांना कारवाईला समोरे जावं लागत आहे. त्यामुळे कुणीही आपल्या परदेशी प्रवासाची माहिती लपवू नका.