सांगली । प्रथमेश गोंधळे ।
सांगलीवाडीतील चिंचबाग मैदानावर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतानाही आदेशाचे उल्लंघन करत कबड्डीचे सामने भरविल्या प्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत 700 ते 800 जणांचा जमाव जमवून स्पर्धा घेतल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. शशिकांत गणपती फल्ले आणि लक्ष्मण बसाप्पा माळगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. अशातच 25 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सामने, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. असे असतानाही सांगलीवाडी मधील चिंचबाग मैदानावर मोठ्या प्रमाणात कबड्डीचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्यांमध्ये कोणतेही नियम पाळले जात नव्हते.
प्रेक्षकांची मोठी गर्दी सामना पाहण्यासाठी उसळली होती. याठिकाणी येणाऱ्या एकही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावलेला नव्हता. अखेर चार दिवसानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी संयोजकांवर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेश गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फल्ले आणि माळगे या संयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.