Satara News : माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ; गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांना पोहोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मर्जितल्या शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदाबरोबर ठाणे आणि सातार्‍याच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली. त्यामुळे शंभूराज देसाई यांचा प्रशासनातील दबदबा वाढला. त्या दबदब्याचा वापर त्यांनी विकासासाठी कमी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी जास्त केला. त्याच अभिर्वावात ते माध्यमांशीही वर्तन करायला लागले अन् अडचणीत आले. माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या संदर्भातील गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला देखील आहे. त्यामुळे सातार्‍याच्या शंभुराजेच्या पालकमंत्रिपदाच काय होणार? याची जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

शिवतारेंचा झाला होता राजकीय गेम

पुरंदर विधानसभा मतदार संघातून 2014 ला विजय शिवतारेंनी शिवसेनेच्या तिकीटावर दुसर्‍यांदा विजय मिळविल्यानंतर सेना-भाजप युती सरकारमध्ये त्यांना जलसंपदा राज्यमंत्रीपदासह सातार्‍याचे पालकमंत्री पद मिळाले होते. मात्र, डीपीडीसी आणि प्रशासकीय बैठका वगळता ते फारसे जिल्ह्यात फिरकत नव्हते. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांना विश्वासात घेत नसल्याने तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात रान उठवले होते. पालकमंत्र्यांनी उपकाराची भाषा करू नये, असा घरचा आहेर विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाईंनी त्यावेळी शिवतारेंना दिला होता. त्यानंतर विजय शिवतारे शिवसेनेत दुर्लक्षित झाले होते.

शंभूराजेंवर शिवसैनिकांचाही होता रोष

मूळ शिवसेनेत असताना शंभूराज देसाई यांनी देखील आपल्या पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेनेपेक्षा आपल्या गटाचेच राजकारण केले. शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांनी एखादा कार्यक्रम राबविल्याचे कोणाच्या पाहण्यात वा ऐकण्यात नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलही शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पक्षप्रमुखांकडे तक्रारी झाल्या होत्या. पाटणमध्ये आजही ते देसाई गट या नावावरच राजकारण करताना दिसतात.

अधिकार्‍यांमध्ये सुप्त नाराजी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रशासकीय अधिकार्‍यांसोबतच्या वर्तनाची देखील सगळीकडे चर्चा होते. कारखान्यातील कर्मचार्‍याला बोलल्यासारखे ते अधिकार्‍याला बोलतात. जाहीर कार्यक्रम, बैठकीत अधिकार्‍यांना एकेरी बोलणे, प्रोटोकॉलचा मुद्दा काढून सर्वांसमोर झापणे, असे त्यांचे स्टंट नेहमीच पाहायला मिळतात. यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये पालकमंत्र्यांबद्दल सुप्त नाराजी आहे. मात्र, जाहीरपणे कोणी बोलायचे धाडस करत नाही. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे दाखविण्याच्या नादात त्यांचा अनेकदा संयम सुटतो. अशा प्रकारांमुळे पालकमंत्री टीकेचे धनी होतात.

पालकमंत्र्यांना जबाबदारीचे हवे भान

जिल्ह्याचा पालक या नात्याने पालकमंत्र्यांची नियुक्ती असते. विकासाच्या अनुषंगाने विशेष अधिकार असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांना सतत कार्यरत आणि सतर्क राहावे लागते. आपत्ती, दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी जावे लागते. कायदा, सुव्यवस्था राखून सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला पालकमंत्र्यांनी मार्गदर्शन करणे महत्वाचे असते. त्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे असते. पुसेसावळीतील घटना घडल्यानंतर नऊ दिवसांनी त्यांनी दंगलग्रस्त गावाला भेट दिली. वास्तविक पालकमंत्र्यांनी तात्काळ घटनास्थळी जाणे आवश्यक होते.