हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयफोन खरेदी करण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र आयफोनची इच्छा आपल्या बाळालाही विकायला भाग पाडू शकते हे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. याठिकाणी आयफोन खरेदी करण्यासाठी नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकून टाकले आहे. दुसऱ्या मुलाला देखील विकण्याचा प्रयत्न करत असताना हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. माणुसकीला आणि मातापित्यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील गांधीनगरमध्ये साथी कनई आणि जयदेव नावाचे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. या दोघांना एक आठ महिन्यांचे बाळ तर लहान मुलगा आहे. जयदेव रोज सकाळी मोलमजुरीच्या कामाला जात असे. एके दिवशी मात्र अचानक त्यांच्या शेजारच्यांना या दोघांकडे नवीन कोरा आयफोन दिसला. तसेच संबंधित महिला रील बनवण्यासाठी गावात फिरत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर शेजारच्यांनी या दोघांची याबाबत चौकशी केली. मात्र या दोघांनीही कोणतीच माहिती शेजारच्यांना देखील कळून दिले नाही.
थोड्या दिवसांनी पुन्हा त्यांच्या घरात बाळ दिसत नसल्यामुळे शेजारच्यांनी दांपत्याची कसून चौकशी केली. तेव्हाच आयफोन घेण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे आठ महिन्याच्या बाळाला विकले असल्याची माहिती या दांपत्याने शेजारच्यांना दिली. यानंतर हा सर्व घडलेला प्रकार समोर आल्यामुळे शेजारच्यांनी दांपत्यविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिचा नवरा जयदेव फरार झाला आहे. पोलिसांनी आता या ८ वर्षांच्या बाळाची देखील सुटका केली आहे. तर आरोपी दांपत्य मोठ्या मुलाला देखील विकण्याचा प्रयत्न करीत होती अशी माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे.