सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मेढा- महाबळेश्वर दरम्यान असलेल्या केळघर घाटात आज गुरूवारी दि. 15 रोजी पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात घाटात वाहतूक ठप्प झाले होती. मात्र स्थानिक व वाहन चालकांनी कोसळलेली दरड व छोटे दगड हाताने बाजूला करत दुचाकी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, अद्याप या रस्त्यावर मोठ- मोठे दगड हलविण्यासाठी कोणीही पोहचलेले नाही. गेल्या तीन दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यातच आज केळघर घाटात काळ्या कडाच्या काही अंतरावरच एका अरुंद वळणावर दरड कोसळली. दरड कोसळल्याने मोठे दगड व माती डोंगर माथ्यावरून वाहत आले. रस्त्यावर ही दरड कोसळली. वास्तविक रस्ता रुंदीकरण करत असताना संबंधित विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केळघर घाटात दरड कोसळली pic.twitter.com/td3Qgpr4sw
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) September 15, 2022
या मार्गावर दरड कोसळल्याने मोठ- मोठे दगड हलविण्यात अडचण येत आहे. अद्याप बांधकाम विभागाचे कोणीही घटनास्थळी पोहचले नसल्याने ट्रकसह अनेक मोठी वाहने घाटातच अडकून राहिलेली आहेत. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.