Wednesday, June 7, 2023

दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढला अन…

पुणे प्रतिनिधी। दारूच्या नशेने अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याचे आपण पहिले आहे. नशेत असताना अनेकांनी निष्पाप लोकांचे बळीही घेतले आहेत. तर काही जण स्वतःच्या जीवाला मुकले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) पहाटे दोन वाजता शेलार वस्ती चिखली येथे घडली आहे.

या घटनेत बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय ३५, रा. शेलार वस्ती, चिखली) हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब हा दारू पिऊन मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास महावितरणच्या डीपीवर चढला. यामुळे शॉक लागून तो गंभीररित्या भाजला होता.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्याला तातडीने उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र विजेचा शॉक गंभीर असल्याने उपचारादरम्यान पहाटे चार वाजता या तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिखली पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.