सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई मूळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे पशुधन संकटात सापडले आहे. चाऱ्याचे आणि पाण्याचे दर गगनाला भिडल्याने पशु पालकांची जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. सरकारने तात्काळ चारा छावण्या सुरू करा असे सांगूनही प्रशासन छावण्या सुरू करत नाही. यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी जनावरांच्या दावणीत बसून मणेराजुरी येथे उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने दखल न घेतल्याने हे उपोषण सुरूच होते.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने आटपाडी आणि जत येथे चारा छावण्या सुरु केल्या आहेत. मात्र तासगाव तालुक्यातही भीषण दुष्काळाचे सावट आहे. तासगाव तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच जनावरांना चारा छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी केली जात आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्षांनी थेट जनावरांच्या दावणीतच बसून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. यावेळी बोलताना बाळासाहेब पवार म्हणाले निर्दयी शासनाला व प्रशासनाला जाग यावी म्हणून नुसते निवेदन न देता जनावरांच्या वेदना समजाव्यात म्हणून जनावरांच्या दावणीत मी उपोषणाला बसलो आहे. चाऱ्यासाठी जनावरं कसाबाकड जात आहेत मात्र कुणाला त्याची कणव येत नाही. लाखो रुपये किमतीच पशुधनाला आज कवडीमोलाचा भाव मिळत आहे. तात्काळ चार छावण्या चालू कराव्यात यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू आहे. प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने शिकोबा डोंगराच्या पायथ्याशी हे उपोषण सुरूच होते. जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तो पर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.