औरंगाबाद – राज्यातील भोंगा प्रकरणात वाद वाढतच असताना आता औरंगाबादेतही अशाच प्रकारच्या एका प्रकरणात रेल्वे पोलिस बलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला अशी माहिती दिव्य मराठीशी बोलताना सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. मज्जितच्या दिशने भोंगा लावून नमाज पठणावेळी गाणे वाजवत चिथावणीचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, किशोर मलकुनाईक असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते रेल्वे सुरक्षा दलात पोलिस उपनिरीक्षक आहेत. त्यांची नेमणूक परळी वैद्यनाथसयेथे असून औरंगाबादेतील अमृत साई प्लाझा येथे ते राहतात. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या पोलिस ठाण्याचे हवालदार कारभारी नामदेव नलावडे यांनी याबाबत तक्रार दिली. रेल्वे सुरक्षा बल येथे जबाबदार पदावर असतानाही किशोर मलकुनाईक यांनी शहर पोलिस आयुक्तांचे आदेशाचे उल्लंघन केले. त्यांच्या राहत्या घरामागे असणाऱ्या मज्जितच्या दिशेने लाऊड स्पिकर लावला. नमाज पठण करण्याच्या वेळी लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवले.
दोन धर्म, निरनिराळ्या गटात शत्रुत्व वाढेल आणि एकोप्याने बाधा होईल आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल या दृष्टीने जाणीव असतानाही भोंग्यावर गाणे वाजवून चिथावणी दिली. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भारतीय दंड विधान कलम 505 (1)(ब) आणि 505 (1) (क) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 नुसार किशोर मलकुनाईक या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.