औरंगाबाद – नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात लवकरच तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल औरंगाबाद-वाळुज या 20 किलोमीटर महामार्गावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सायंकाळी लातूरात केली.
दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते बांधणी मुळे केवळ गावेच जोडले जात नाही तर माणसांची मन ही जोडले जातात त्यामुळे महाराष्ट्रातील भक्ती स्थळांना जोडले जाणारे सर्व रस्ते भाविकांचा विचार करुन तयार करण्यात येत आहे. दिंडी मार्गांवरून जाताना भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जात आहे, असेही गडकरी म्हणाले.
कसा असेल तीन मजली उड्डाणपुल –
औरंगाबाद ते वाळुज या मार्गावर तीन मजली पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. सर्वात खाली आठ पदरी रस्ता त्याच्यावर पूल तर तिसर्या मजल्यावर मेट्रो चालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशातील उत्तर आणि दक्षिण या दोन टोकांना जोडणारा सुरत-नाशिक-विजापूर-बंगरुळू या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असून, हा मार्ग मराठवाड्याला जोडण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.