धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये झोपडीला आग लागल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील पढावद शिवारात घडली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या मृत मुलाच्या मोठ्या बहिणीने आरडाओरडा केला असता नागरिकांनी झोपडीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. यानंतर नागरिकांनी अग्नीशमन दलाला बोलावले. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल होताच त्यांनी तातडीने आग विझवली. मात्र तोपर्यंत या आगीमध्ये चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला होता. हि आग कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
या चिमुकल्याची आई शेतात मजुरीचे काम करते. घटनेच्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या दोन मुलांना घरी एकटे सोडून महिला शेतात मजुरीसाठी गेली होती. यावेळी तीन वर्षाचा चिमुरडा झोपडीत झोपला होता. तर त्याची मोठी बहीण घराबाहेर खेळत होती. यादरम्यान अचानक झोपडीला आग लागल्याचे पाहताच बाहेर खेळत असलेल्या मुलीने गावाच्या दिशेने धाव घेत लोकांना याची माहिती दिली. यानंतर लोकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तातडीने आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला होता. यामध्ये तीन वर्षाचा चिमुकला वाचू शकला नाही. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. झोपडीमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याला लहान मुलीसोबत एकटं सोडून मजुरी करण्यासाठी जाणे आईला चांगलेच महागात पडले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.