Tuesday, January 7, 2025

पुणे बेंगलोर महामार्गावर Maruti गाडी पलटी होऊन पेटली; टायर फुटून दुर्घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची- खोडशी गाव हद्दीत एका वॅगनार कारचा टायर फुटून ती पलटी होऊन अपघात झाला. गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हि घडली. या अपघातानंतर कारने अचानकपणे पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील 5 जण बाहेर पडल्याने ते सुखरूप बचावले. या अपघातात कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर कराड पासून ५ कि. मी. अंतरावर असणाऱ्या वनवासमाची- खोडशी गावच्या हद्दीत कार आल्याने तिचे पुढील टायर फुटले. त्यामुळे कारमधील चालकाचा ताबा सुटल्याने ती महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायव्हरवर जाऊन कोसळली. यामध्ये कारच्या आतील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे कारने समोरच्या बाजूने पेट घेतला.

कारने पेट घेतल्याचे पाहताच त्या परिसरात असलेल्या वीट भट्टीवरील कर्मचारी तसेच नागरिकांनी तात्काळ कारच्या दिशेने धाव घेत त्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. या अपघाताची माहिती तात्काळ महामार्ग पोलिस व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, रमेश खूणे यांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व पुढील मदतकार्य केले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाहीत.