हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनच्या मुहूर्तावर गुरुवारी सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्याने जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. मात्र. आमिरचा हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. भारतीय सैन्याचा अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ मधील भारतीय लष्कराच्या चित्रणामुळे सशस्त्र दलांचा अनादर झाल्याचा आरोप दिल्लीस्थित एका वकिलाने केला आहे. शुक्रवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्ससह चित्रपटाचे निर्माते, आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या चित्रपटात एका मतिमंद व्यक्तीला कारगिल युद्धात भारतीय सैन्यात सामील होण्याची परवानगी कशी दिली जाते यावर आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटातील आमिरच्या संवादावरूनही वाद सुरू आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ने पहिल्या दिवशी जवळपास 10 ते 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आमिरचा हा चित्रपट तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्ज, टेलिग्राम यांसह इतर प्लॅटफॉर्म्सवर एचडी व्हर्जनमध्ये लीक झाला आहे.
तक्रारीत काय म्हंटले आहे?
आमिरच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात निर्मात्यांनी कारगिल युद्धात लढण्यासाठी एका मतिमंद व्यक्तीला लष्करात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. कारगिल युद्ध लढण्यासाठी लष्करातील सर्वोत्तम जवानांना पाठवण्यात आलं होतं आणि कठोर प्रशिक्षित लष्करी जवानांनी युद्ध लढलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी मुद्दाम या परिस्थितीचं चित्रण केलं, असे म्हंटले आहे.
वकिलाचा आरोप काय?
वकिलांनी ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटातील एका दृश्याबाबत आरोप केले आहेत. आरोपात म्हंटले आहे की, या चित्रपटातून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या दृश्यामध्ये एक पाकिस्तानी कर्मचारी लाल सिंग चड्ढाला विचारतो की “मी नमाज अदा करतो, प्रार्थना करतो, लाल सिंग तू हे का करत नाही?” त्यावर लाल सिंगच्या भूमिकेतील आमिर म्हणतो, “माझी आई म्हणाली हा सर्व पूजापाठ मलेरिया आहे. त्यामुळे दंगल होतात.” चित्रपटातील हा संवाद संपूर्ण हिंदू समुदायाला उद्देशून बदनामीकारक असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.