हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे.
हिंगोली येथे प्रसारमाध्यांशी बोलताना सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला आणि त्यावेळी तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री यांचे वडील होते. आणि आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते. यांच्याशी देवाणघेवाण करणं राहिलं असेल म्हणून प्रकल्प गुजरातला गेला असावा अशी लोकांत चर्चा आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान , उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील हा प्रकल्प मागील वर्षीच म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच गुजरातला गेल्याचा दावा केला आहे. तसेच हा प्रकल्प परत महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून साधं एक पत्रही केंद्र सरकारकडे गेलं नाही, असा उलट आरोप उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून पुन्हा एकदा राज्यात आरोप -प्रत्यारोपाच्या फैली झडताना पाहायला मिळत आहेत.