हार के जितने वाले को बाजीगर कहते है ! चारवेळा अपयश येवूनही अभिजीतची UPSC मध्ये बाजी

Abhijit Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर या चित्रपटातील ‘हार के जितनेवाले को बाजीगर कहते है’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. मात्र, या डायलॉगमुळे अनेकांमध्ये काही तरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण होते. अशीच जिद्द धुळ्यातील अभिजीत पाटीलने केली आणि. चारवेळा अपयश येऊनही त्याने पाचव्यांदा UPSC मध्ये उत्तीर्ण होत यशाला खेचून आणले. पाहूया अभिजीतच्या जिद्दीची यशोगाथा…

धुळ्यातील एक उच्च शिक्षित तरुण असलेल्या अभिजीत पाटील याने आपल्या कठोर परिश्रमातून यूपीएससीच्या परीक्षेत देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत अभिजीतला चारवेळा अपयश आले. मात्र, तो खचून गेला नाही. खचून न जाता त्याने अभ्यासात सातत्य ठेवले. कारण त्याला माहिती होते कि एक दिवस आपण परीक्षेत यश नक्की मिळणार. त्याने आपला अभ्यास सतत चालू ठेवला. आणि अखेर पाचव्यांदा परीक्षेत उत्तीर्ण होत यश खेचून आणले.

धुळ्यात घेतलं मेकॅनिक इंजिनिअरिंगच शिक्षण

अभिजीतने आपले सुरुवातीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे धुळ्यात पूर्ण केले. या ठिकाणी असलेल्या जयहिंद शाळेतून त्याने यश मिळवले. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बाहेर शिक्षणासाठी न जात याच ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने सुरुवातीला मेकॅनिक इंजिनिअरिंग या क्षेत्राची निवड केली. सिंहगड कॉलेजमधून त्याने मेकॅनिक इंजिनिअरिंग पूर्ण केले. या परीक्षेमध्ये त्याने प्रथम क्रमांकाने यश मिळवले. नंतर त्याला पहिल्याच वर्षी त्याला कॉग्निझंट या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली.

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी

अभिजितने तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी व्हावे अशी त्याच्या वडिलांची खूप इच्छा होती. कारण त्याचे वडील एक सरकारी अधिकारी होते. मनात असलेली इच्छा त्याच्या वडिलांनी अनेकदा बोलूनही दाखवली होती. त्यामुळे अभिजितला कॉग्निझंट कंपनीत नोकरी जरी मिळाली असली तरी त्याचे मन त्यामध्ये लागत नव्हते. काहीही झाले तरी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायचीच असे त्याने ठरवले. मग त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पुणे गाठले. पुण्यामध्ये चाणक्य मंडलमध्ये त्याने UPSC च्या अभ्यासाला सुरूवात केली.

पुण्यातून थेट दिल्लीला झेप

सुरुवातीला पुण्यात राहून अभ्यास करत असलेल्या अभिजीतला या याठिकाणी काही यश मिळत नसल्याचे जाणवले. त्याने पुढे दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर थेट दिल्लीत झेप घेतली. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्याने अभ्यासाचे नियोजन केले. पहिल्या दोन प्रयत्नामध्ये अभिजीतच्या हाती काहीच लागले नाही. पण निराश न होता त्याने आपले प्रयत्न पुढे सुरूच ठेवले. तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली. तसेच चौथ्या प्रयत्नावेळीही झाले. पण सलग दोनदा मुलाखतीपर्यंत गेलेल्या अभिजीतला पाचव्या प्रयत्नात मात्र यश मिळाले.

अभिजीतच यश अनेकांसाठी प्रेरणादायी

अभिजीतने आपल्या यशाचा धुळ्यातून सुरु केलेला प्रवास हा दिल्लीत जाऊन पूर्ण केला. या यशात त्याचे वडील राजेंद्र पाटील आणि आई मंदाकिनी पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्याचसोबत त्याच्या मित्रपरिवारानेही त्याला अभ्यासात साथ दिली. अभिजीतचे हे यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.