हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचण येत होती . यापार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाल्यानंतर उद्या सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा असे निर्देश कोर्टाने महापालिकेला दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ऋतूजा लटके २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, अनेक दिवस होऊनही महापालिकेने त्यावर अजून निर्णय दिलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा त्यांनी म्हंटल.
त्यानंतर कोर्टाने पालिका वकिलांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितले. यावेळी ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराची तक्रार असल्याची माहिती महापालिका वकिलांनी दिली . 12 ऑक्टोबरला म्हणजे कालच ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. लटके यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पालिकेत कधी आल्याचं नाहीत. त्यांनी ३० दिवसाचा नोटीस पिरिडी पूर्ण करायला हवा होता असं पालिका वकिलांनी सांगितलं.
दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर कोर्टाने महापालिकेला फटकारलं आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा अशा सूचना महापालिकेला दिल्या . कोर्टाच्या या निर्णयानंतर लटके यांचा पोटनिवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे.