सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मायणी येथील मेडिकल कॉलेज फुकटात हडपण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी डाव टाकला होता. मात्र सभासदांना वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांच्या कृत्याचा विरोध झाला. त्यामुळेच आमदार जयकुमार गोरे हे कॉलेजची बदनामी करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. कॉलेज हडप करण्याचा त्यांचा डाव देशमुख कुटुंबीय यशस्वी होऊ देणार नाही. पक्षीय झूल बाजूला ठेवून त्यांनी आमच्याशी सामना करावा. राष्ट्रवादीवर केलेले आरोप हे प्रसिद्धी स्टंट असल्याचा आरोप मायणी मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला आहे.
आमदार गोरे यांनी नुकतीच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेज व देशमुख कंपनीवर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्या आरोपांचे पुराव्यानिशी खंडन करीत आज देशमुख यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. दीपक देशमुख म्हणाले, जनतेचे लक्ष वळवण्यासाठी आमदार गोरे हे बालिश आरोप करत आहेत. आ. जयकुमार गोरे यांनी केलेल्या मायणी कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांना भेटून ईडीच्या कारवाईची मागणी करणार असून तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देण्यास देशमुख कुटुंबीय कुठेच कमी पडणार नाहीत.
योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार : दीपक देशमुख
संस्थेची मालमत्ता असलेले जमिनीचे गट नंबर 766 व 767, तसेच गट नंबर 606, 773, 774, 766 अ, 767 अ या सर्वांचे बिगर शेतीचे आदेश प्राप्त असताना संस्थेची जमीन एनए नसल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांनी केला आहे. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपकरणे व मशिनरी उपलब्ध नाहीत म्हणणाऱ्या गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी हॉस्पिटलचा करार केला. त्यामध्ये सर्व मशिनरी असल्याचे कसे काय नमूद केले आहे, याचा खुलासा “करावा. त्यांनी केवळ दमदाटीची व दडपशाहीची भाषा करू नये, त्यांना आम्ही भीक घालणार नाही. त्यांनी 40 गुन्हे दाखल केले, तर आम्ही 41 गुन्हे दाखल करू. तेवढे पुरावे आम्ही गोळा केले आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढू, असा इशारा उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी दिला आहे.