साताऱ्यातील ‘या’ प्रकरणावरून अभिनेते सयाजी शिंदेंनी गाठलं थेट मंत्रालय; अजित पवारांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ अभिनेते तथा राज्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवून देवराई फुलवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये जाऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भेटीमध्ये सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर पवारांशी चर्चा केली. चार वर्षांपूर्वीपासून साताऱ्यात बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केले जात आहे. त्यासाठी पोलिसांची २५ एकर जमीन मिळाली होती. मात्र, आता स्थानिक पोलीस अधीक्षक समीर शेख पार्क करता येत नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणावरून या संदर्भात बोलण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुंबईला जाऊन मंत्रालयात थेट उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली. त्यांच्याशी घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करत वन प्रसाद योजनेच्या माध्यमातून प्रसाद म्हणून प्रकल्पासाठी झाडे देण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, शिंदेंसोबत चर्चा झाल्यानंतर अजित पवारांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद असधला. यावेळी ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आम्ही साताऱ्यात पोलीस डिपार्टमेंटची सव्वाशे एकर असलेल्या जागेत पोलीस डिपार्टमेंटच्या पोलीस अधीक्षकांच्या आणि आमच्या विनंतीवरून त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क उभे करण्याचे ठरले. चार वर्षे त्या ठिकाणी कामही झाले आहे. अचानक सातारा येथे नवीन पोलीस अधीक्षक समीर शेख आले आणि त्यांनी सांगितले कि आम्हाला वरून प्रेशर आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी बांधकाम करू देऊ शकत नाही. त्यांना आम्ही वेडे होतो का अगोदर 4 वर्षे या ठिकाणी काम करायला? असा सवाल केला.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही एकदा भेट घेतली होती.तेव्हा त्यांनीच 1 कोटी रुपये याप्रोजेक्ट साठी मंजूर केले होते. तो प्रोजेक्ट पूर्ण होत आला असताना आता सांगितले जात आहे कि या ठिकाणी पेट्रोलपंप, घरे बांधकाम करायची आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली आणि त्यांना सर्व विषय सांगत असं का होत असल्याची विचारणा केली असता त्यांनी सातारा जिल्हाधिकाशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महासंचालक फोनवरून सांगितले कि 25 एकर जागा सोडून जी जागा आहे त्याठिकाणी काम करूया, अशा सूचना केल्या.

साताऱ्यात 1 हजार प्रजाती जीवाचं रान करून लावलेल्या आहेत. राज्यातील शास्त्रज्ञ सुहास वायंगणकर, एस आर यादव, साळुंखे अशा ग्रेट माणसांच्या मार्गदर्शनाखाली तेथे देवराई उभी राहते हे साताऱ्यासाठी फुप्पुस असेल. एक उत्तम अशी बायोडायव्हर्सिटी पार्क उभी राहील. दोन वर्षांपूर्वी एक सचिवाने अचानक येथील प्रकल्प बंद करून सामाजिक वनीकरण करायला सांगितले होते. सामाजिक वनीकरणाकडे तीस ते चाळीस प्रकारच्या सुद्धा प्रजाती नसतात. उलट आमच्या सह्याद्री देवराईच्या वतीने आम्ही 1 हजार प्रजाती त्या ठिकाणी लावत असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नको : शिंदे

वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नको आहे. बायोडायव्हर्सिटीचे केवळ बोर्ड लागलेले आहेत. त्यात आम्हांला पडायचं नाही आहे. परंतु आम्ही जे करतो त्याला मदतीची गरज आहे. वनविभाग, महसूल विभागाची मदत मिळते आहे, परंतु काही अधिकारी या टेबलावरुन त्या टेबलावर करतात, त्यामुळे वेळ वाया जातो. त्यांचंही सहकार्य मिळावं, यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.