अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसे घालणार राडा; काळे झेंडे दाखवण्याचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये उत्तर सभा घेणार आहेत. येत्या 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडेल. मात्र अजित पवार यांच्या उत्तर सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 27 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा या सभेत घुसून आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू असा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या सभेत राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनसेकडून बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. “राज्याचे कृषिमंत्री बीडचे असून बीडच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप मनसेने यावेळी लावला आहे. त्यामुळे जर या शेतकऱ्यांना 27 ऑगस्ट पर्यंत मदत जाहीर झाले नाही तर आम्ही अजित पवार यांच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू” असा थेट मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.

गेल्या काही महिन्यात राज्यात झालेल्या पावसानंतर बीड मधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, अशा शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करण्यात यावी आणि पिक विमा देखील मंजूर करण्यात यावा ही मागणी मनसेकडून उचलून धरण्यात आली. तसेच, बीडमध्ये मनसेने केलेल्या आंदोलनात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळीच सरकारने जर शेतकऱ्यांचे दखल घेतली नाही तर अजित पवारांच्या सभेत काळे झेंडे दाखवू असा इशारा देण्यात आला. यामुळे आता मनसेच्या या मागणीवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये शरद पवार यांची भव्य सभा पार पडली आहे. या सभेनंतर आता अजित पवार देखील बीडमध्ये उत्तर सभा घेणार आहेत. सध्या बीड मधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाणीटंचाई, पिकांचे नुकसान , कोरडे पडलेले प्रकल्प अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अजित पवार यांची बीडमध्ये सभा होत असताना ते या शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.