हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तरोत्तर दौऱ्यावर असून यावेळी एका जाहीर भाषणात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कडून फक्त दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तेव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.
कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मुंबईत असणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा गावी जायचे होते. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली. मात्र, केंद्राने या मागणीकडे दुर्लक्ष करत दोन महिन्यांनी ट्रेन सोडल्या. मात्र, त्यासाठीदेखील तिकिट आकारणी केली. या तिकिटांचे पैसे राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून भरले असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले
दरम्यान, उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. हे मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून ७ मार्च रोजी अखेरच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे.