मुंबई । अभिनेता सुशांत सिंह मृत्युप्रकरणात भाजपकडून करण्यात येत असलेल्या वैयक्तिक आरोपांविषयी अखेर आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सध्या सुशांत सिंह मृत्युप्रकरणावरून गलिच्छ राजकारण सुरु आहे. यामध्ये व्यक्तिश: माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक केली जात आहे. ही एक प्रकार वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. पण मी अजूनही संयम बाळगला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
“सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबईचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही… मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
“मी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत सुशांत सिंह मृत्युप्रकरणी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे आरोप केले. अभिनेता दिनो मोरिया याचा बंगला सुशांतच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. दिनोच्या घरी मंत्र्यांचं रोज येणं-जाणं असतं. हे मंत्री येथे करतात तरी काय, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता.
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”