महाबळेश्वर प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
महाबळेश्वर येथील विकासासाठी सुमारे १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच महाबळेश्वर बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी शासनस्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महाबळेश्वरच्या बाजारपेठेच्या आराखड्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्यामुळे त्यांच्या शिष्टमंडळाने आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मंत्री ठाकरेंनी व्यापार्याची नाराजी दूर करीत महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांसह कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
मुंबई येथे मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात मंत्री आदित्य ठाकरे यांची शिवसेना माजी शहरप्रमुख सुनिल साळुंखे, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, शहरातील व्यापारी केतन यादव, हेमंत साळवी, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, संजय बोधले यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी आमचा सुशोभिकरणाला कोणताही विरोध नाही. परंतू बाजारपेठेच्या नियोजनामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडा करावा, अशी मागणी मंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. शहराचा योग्य विकास करण्यासाठी माझे प्रयत्न असून त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलणार आहे. येथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच येथील काम करण्यात येईल. तसेच वास्तुविशारद जोशी, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याचे आश्वासनही त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.