Wednesday, October 5, 2022

Buy now

आदित्य ठाकरेंचा नाशिक, जळगाव दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंपुढे पक्षसंघटनेच मोठं आव्हान उभे राहील आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र तब्बेत बिघडल्याने त्यांचा हा दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आत्तापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात निष्टा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा 9 आणि 10 ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा तात्पुरता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शिवसेनेतील पडझड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत आहे. आदित्य यांच्या प्रत्येक दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शिवसैनिकांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात त्यांचा जोरदार समाचार घेतल्याचं आपण पाहिलं आहे. आदित्य ठाकरेंना शिवसैनिकांच्या मिळालेल्या पाठिंब्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे हे मात्र नक्की.