हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले मात्र, काहींनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरु ठेवला आहे. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “राज्यात काही ठिकाणी पोलिसांकडून तसेच आगारप्रमुखांकडून जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना कामावर रुजू होण्यास भाग पाडले जात आहे. या इंग्रजांप्रमाणे असलेल्या हुकमी सरकारला कर्मचाऱ्यांची कोणतीही दया येत नाही. पण आम्हीही आमचा लढा सुरु ठेवणार आहोत,” असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. दरम्यान आज सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी संप, आंदोलन केले जात आहे. मात्र, आज काही ठिकाणी पोलीस व आगारप्रमुखानी कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवत त्यांना कामावर रुजू होण्यास भाग पाडले. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही चुकीची घोषणा दिली नाही. किंवा चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले नाही. तरी देखील त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एका कष्टकऱ्यानं एसटीवर दगड मारलेला नाही. तरी देखील पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
सध्या 95 टक्के कर्मचारी दुखवट्यात आहेत. काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले. नाहक 35 कष्टकऱ्यांना डांबून ठेवण्यात आले. नंतर कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दहशत निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणांचा वापर होत आहे. या बेकायदेशीर अटकेची चौकशी व्हावी. आज उस्मानाबादेत एक घटना घडली. एका वाहकाला जबरदस्तीने कामावर जाण्यास सांगण्यात आले. त्याला गाडीत बसण्यास सांगण्यात आले. मात्र, आता कर्मचारी अशा प्रकारची कारवाई सहन करणार नसल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.