हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकात मराठी गाड्यांवर हल्ला करण्यात आल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत जर मराठी माणसांवरील हल्ले थांबले नाहीत तर मला स्वतः बेळगावला जावं लागेल असं म्हंटल होत. पवारांच्या या इशाऱ्यामुळेच कर्नाटकने नरमाईची भूमिका घेतली असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
प्रसामाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पवारसाहेब स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे काय होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश पवारसाहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही.
दरम्यान, सीमावादावर जे काही घडत आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्या तारखा लागतील परंतु हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे याना लगावला.