हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाली. काल अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आज एकनाथ शिंदे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाछटा कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी घेतली जाणार आहे. ही बहुमत चाचणी पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार तसेच काय करणार? याबाबतचा प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे.
शिंदे सरकार आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीला सामोरे जाईल. त्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवन प्रेस रूममध्ये माध्यमांशी गटातील आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवाद साधणार आहेत. त्यानंतर हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. नंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ( शिवाजी पार्क मधील) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले जाणार असून त्या ठिकाणाहून ते चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांच्याकडून अभिवादन केले जाणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट ठाण्याकडे रवाना होणार आहेत. ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील, असा दिवसभराचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेला आहे.