पालकांच्या विरोधानंतर मनपाने ‘तो’ निर्णय घेतला मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन केले होते. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करूनही टाकली. पण हा निर्णय पालकांना विश्वासात घेऊन घेतला नाही. आता पालकांनीच कडाडून विरोध केल्याने महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले. रविवारी शाळा बंदच राहणार असे महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या तिन्ही लाटांमध्ये शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण होते. पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते, काही भागात इंटरनेट नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला. त्यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी अजित पवार यांनी रविवारी सुट्टी रद्दचा पर्याय दिला होता.

एक दिवस तरी विद्यार्थ्यांना मोकळा हवा अशा प्रतिक्रिया काही पालकांनी नोंदविल्या आहेत. त्यामुळे आता शनिवारी पूर्णवेळ शाळा भरली जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाईल. येत्या शनिवारी शिवजयंतीचे सुट्टी आहे, असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले. अशाप्रकारे निर्णयाच्या अंमलबजावणीत आधीच महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले.