आग्या मोहाच्या मधमाश्यांचा मेंढपाळांवर हल्ला; 9 जखमी, 2 बालकांचाही समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण । सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मंद्रुळकोळे परिसरातील एका शिवारात आग्या मोहाच्या पोळ्याला धक्का लागल्याने चिडलेल्या मधमाशांनी मेंढरांच्या कळपासह मेंढपाळ कुटुंबीय व काही शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सुमारे 9 जण जखमी झाले असून यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. सदरची घटना गुरूवारी (दि. 25 मे रोजी ) घडली असून मधमाशांनी चावा घ्यायला सुरुवात केल्यानंतर कळपातील अनेक शेळ्या, मेंढ्या सैरावैरा पळाल्याने त्यांचा शोधण्याचे काम रात्रीपर्यंत सुरूच होते.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ मेंढरांचे कळप घेवून दोन दिवसांपासून मंद्रुळकोळे गावाजवळ वांग नदी काठावरील शिवारात त्यांचा मुक्काम आहे. आज सकाळी त्याच परिसरात असलेल्या नळ योजनेच्या विहिरीजवळ थांबलेला असताना, कळपाचा अचानक झाडावरील आग्या मोहाच्या पोळ्याला धक्का लागला. यावेळी मधमाशांनी कळपातील मेंढ्या, तसेच शेळ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्व जण सैरावैरा धावू लागले. मधमाशांनी चावा घेतल्याने स्वप्नाली रानगे, देवेंद्र रानगे या लहान मुलांसह सुरेश कोळेकर, भैय्या रानगे, बाळू यमगर, राधिका रानगे, विठ्ठल यमगर आणि काही स्थानिक शेतकरीही जखमी झाले.

मधमाशांच्या भीतीमुळे कळपातील अनेक मेंढ्या आणि शेळ्या दिसेल त्या दिशेला सैरावैरा धावू लागल्या. त्यामुळे त्या मेंढ्यांचा आणि शेळ्यांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. येव्हडच नव्हे तर जवळच शेतात असलेल्या विहिरीत पोहायला गेलेल्या काही जणांनाही मधमाशांनी गाठले होते. मात्र, विहिरीवर मधमाशा दिसताच पोहणाऱ्यांनी पाण्यातच बसणे पसंत केलं. कळपातील मेंढरांच्या छोट्या कोकरांना मधमाशांचा चावा सहन न झाल्याने त्यांची स्थिती गंभीर बनली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या काही जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.