पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. मात्र, हे प्रकरण पाडळकरांच्या चांगलाच अंगाशी आलं आहे.
जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.
जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा pic.twitter.com/UWUigEQbnI
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) February 12, 2021
शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच आज पहाटे शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.