हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये ही फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळातील समीकरणे पूर्णपणे पालटून गेली आहेत. अशातच शरद पवार गटाने अजित पवार गटाला एक मोठा दणका दिला आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासाठीचे पत्र त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पाठवले आहे. यानंतर आता पलटवार म्हणून अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे केली आहे.
शरद पवार गटात विरोधात आक्रमकाची भूमिका घेत शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा अशी याचिका अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. मात्र, या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावे वगळण्यात आली आहे. तसेच , वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. त्याचबरोबर, श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचा देखील सदस्यत्व रद्द करा अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांना अपात्र करण्याचे मागणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली होती. या मागणीसाठी त्यांनी राज्यसभेचे सभापती यांना पत्र देखील पाठवले होते. त्यामुळे यावर प्रत्युत्तर देत अजित पवार गटाने देखील शरद पवार गटाच्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे अजित पवारांनी शरद पवार आणि विरोधात नवा डाव रचला असल्याचे म्हटले जात आहे.