ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी होय; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या शिबिरास सुरुवात झाली. यावेळी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री होणे गैर नाही, पण ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे ही बेईमानी आहे,” अशी टीका अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

शिर्डीत आजपासून सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ शिबिरास अजित पवारांनी उपस्थिती लावली. यावेळी पवारांनी आपल्या पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा सल्लाही दिला आहे. यावेळी पवार म्हणाले की, ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत, आपल्या लोकांना ही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे, त्यांना वाटत जे केले ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे योग्य नाही. शिवसेना बाबत जे घडले, नाव गेले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही.

सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे. हे शिंदे सरकार जितकं सत्तेवर राहील, तितकं अधिक महाराष्ट्राचं, इथल्या जनतेचं नुकसान करत राहतील, ही राज्यातल्या जनतेची लोकभावना आहे, असे पवार यांनी म्हंटले.