हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामकाजात अधिक सक्रिय झाले आहेत. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना टक्कर देण्यासाठी अजित पवारांनी नवा डाव आखला आहे. बंड केल्यानंतर अजित पवार यांनी पहिले राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 30 आणि 1 तारखेला अजित पवारांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. तसेच मध्यंतरी त्यांच्या अनेक सभा विविध ठिकाणी पार पडल्या. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून राज्यस्तरीय अधिवेशन बोलवण्यात आले आहे. हे अधिवेशन येत्या 30 आणि 1 तारखेला कर्जतमध्ये घेण्यात येणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्यभरातून आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील. तसेच अजित पवारांची प्रमुख उपस्थिती राहील. मुख्य म्हणजे, या अधिवेशनाच्या माध्यमातून अजित पवार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं.
दरम्यान, सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पक्ष आणि चिन्हावरून वाद सुरू आहे. या संबंधित सुनावणी निवडणूक आयोगापुढे चालू आहे. पुढील सलग तीन दिवस निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सुनावणी करणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच अजित पवार यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची बातमी समोर आल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, हे अधिवेशन शरद पवारांना चेकमेट करण्यासाठी बोलवण्यात आल्याची चर्चा देखील रंगली आहे.