हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठवाडा आणि विदर्भात पुराच्या संकटामुळे लोकांची घरे पडली असून पिकांचं नुकसान झालं आहे. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ 5 हजार रुपये मदत देणे गरजेचे होते. पण माहूर तालुक्यातील एका शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई मिळाली नाही. या दुःखापोटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता एकनाथराव तुम्ही मला सांगा 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?,” असा सवाल पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
अजित पवार आणि आमदार धनंजय मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही राज्याच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहोत. आमच्या दौऱ्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही हा दौरा राजकारणासाठी करत नाहीत. त्यामुळे सरकारनेही राजकारण करू नये. या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे, कारण अतिवृष्टी होऊन बरेच दिवस झाले तरी साधी मदत सोडा पंचनामे सुद्धा झाले नाहीत.
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील करमुडी, पिंपरखेड येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अधिकचा पाऊस पडल्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची गावकाऱ्यांकडून माहिती घेतली; आर्थिक मदत मिळण्याबाबत त्यांना आश्वस्त केलं. pic.twitter.com/gdNzqwfAVU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2022
आपण राज्याचे मुख्यमंत्री झाला आहात पण संकटात असलेल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, 15 दिवस झाले तरी संकटातून बाहेर काढू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे म्हणत आहेत. पण दौरे महत्वाचे आहेत की माणसांचे जीव?, असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.